Posts

प्रेरणास्थान

विद्यामंदिरी प्रवेश करितालक्ष वेधूनी घेते भव्य चित्र हे सरस्वतीचे प्रसन्न मन करिते
निळ्या जलाशयी भव्य धवल हे कमल पुष्प उमलले तया कर्णिकी गोड मधुर ते रूप असे विलसले
कंचुकी हिरवी अंगी शोभली शुभ्र धवल वसन नाजुक अंगुली फिरती विणेवर दिसे हास्य वदन
वरद हस्त ही मस्तकी ठेवी देई ज्ञान आम्हाला संसाराचे जहाज तराया सोपा मार्ग जगाला
या बालांनो, या कलिकांनो वेचू कण ज्ञानाचे विद्या देवी हीच आमुची स्थान प्रेरणाचे

माझा गाव

गाव माझा ग लाडकातीन टेकड्यांच्या आत तळे अथांग भरले गावाच्या दक्षिणेत
पश्चिमेस वाहे ओढा गर्द घनदाट राई आणिक नागदेव विसावा तिथे घेई
पुर्वेच्या माळामागे लाली पहाटेची आली विठुरायाची ग माझ्या काकड आरती सुरु झाली
कुठे दळण चालते पहाटेच्या या प्रहरी हनुमंता आळविते जात्यावरी ती सुंदरी
माझ्या दाराच्या समोर विठुरायाचे मंदिर पोथी किर्तन चालते भक्त येती निरंतर
असा माझा गाव सान परि वाटे तो महान त्याचे गुण वर्णीतांना मज होई अभिमान

मोठी आई

डोळे मिटूनी वाटे वरतीबसले मी बाळा कानी घुमतो अविरत माझ्या तव घुंगुरवाळा
बघता बघता वर्ष जाहले वाढदिवस आला आकाशीचा बालरवी हा आज नवा उगवला
सहस्त्र किरणे लखलख करिती प्रकाश पसरूनी देई आम्रतरुवर कोकीळ राणी गाते अंगाई
फांद्याच्या ह्या टिपऱ्या वाजवी पानझडीचा वारा वसंतात हा वसंत आला चमत्कार सारा
काऊ-चिऊचा घास भरविते आई प्रेमाने दूर जरी मी जवळी तुझ्या रे असते सातत्याने
खूप शिकुनी मोठा होई
स्वैर भरारी घेई आशिर्वाद मी देते तुजला तुझीच मोठी आई बाळा तुझीच मोठी आई

स्त्रीधर्म

प्रातः काळी कुणी सुंदरीमंदिरात दिसलीफुल हार निरांजन तबकी घेवून ती विलसली
भाळी कुंकुम, मंगळसूत्र मांगल्ये भरले करी कंकण ती किण किण करिती हात तिचे जुळले
डोळे सुंदर, चेहरा भोळा हास्य मधुर अधरी भक्तिभावे निरांजन ती ओवाळी सुंदरी
धूप दीप नैवेद्य ही झाला अर्पण हा प्रभूला डोळे मिटूनी ध्यान लावते मंत्र मुग्ध बाला
काय मागणे असेल तिचे हे मजशी पडे साकडे "जन्मोजन्मी मज हेची मिळावे सौभाग्याचे चुडे"
भारतीय संस्कृती सांगते आपुली जगताला पती चरणाशी विलीन रहावे जागुणी धर्माला
हेची दान तू मागशील जरी जाशील भव तरुणी साधू संत ही हेची सांगती घे ओंजळ भरुनी

वाढदिवस

दोन फुलांच्या मध्ये उमललीकळी गोड गोजिरी खेळ खेळूनी स्वैर लकेर्या उधळी वाऱ्यावरी
डोळे बारीक करिती लुकलुक हास्य मधुर अधरी काही बोलण्या जीभ वळवळे शब्द न उमटे परि
या चिमण्यांनो अंगणी माझ्या दूधभात खावया राणी इवली बोलावितासे तुम्हा जेवावया
दुडू दूडू रांगे मागे मागे मन माझे बहरले फुलराणी ग या शुभसमयी वर्ष तुला जाहले
आयुष्यमान हो बाळे लाभो सुख सर्वदा तुला लीन होऊनी हेची मागते श्री प्रभू चरणाला

चिमणीची पिल्लं

चार पिल्लांनी घरटे भरलेचिमणा चिमणी दंग चाऱ्यासाठी वण वण फिरती पाहुनी उठती तरंग
ऊन असो की पाऊस पडता किंव्हा सुटला वारा खंत कशाची नच बाळगिता कण कण जमविती चारा
दूर कुठे हा जाता चिमणा चिव चिव किलबिल भरी चाहूल कुठूनी जरा लागता शांत होती सारी
पंख हलवूनी उडू पाहती फड फडाट चाले कृती तयांची पहूनिया मी आनंदुनी गेले
परंतु जेव्हा येऊनी शक्ती जातील उडूनी सारी घरटे येथील होईल रिकामे दुःख वाटते भारी

कोडे

भव्य जलाशय जवळी असतातृष्णा शमविण्या परी ते दूर पसरले मृगजळ फसवे का मन वेधून घेते?
अंगणी माझ्या तुळस गोजिरी वाऱ्यावर डूलते तव अंगणीचा गुलाब बघता भूल कशी पडते?
काटेरी ते रूप जयाचे जगताला ठावे हे न कळे पर वेड तयाचे का मग लागावे?
आहे त्यावरी तृप्त न होता मन धावे वेडे बुद्धी हिन मी विचार करुनी नच सुटते कोडे…